दिल्लीतील संघ मुख्यालयाला सीआयएसएफ सुरक्षा प्रदान

दिल्ली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा दिली गेली आहे. त्या दलाचे जवान अत्याधुनिक शस्त्रांसह येथे तैनात केले गेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झेड प्लस सुरक्षा कव्हर मानदंडानुसार मध्य दिल्लीतील झेंडेवालान स्थित केशव कुंज कार्यालयाला १ सप्टेंबर पासून सुरक्षा पुरविली गेली आहे.

नागपूर येथील संघ मुख्यालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पूर्वीच केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा दिली गेली असून भागवत यांना झेड प्लस सुरक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील विभिन्न गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. सुरक्षेसंदर्भात निश्चित केल्या गेलेल्या मानदंडानुसार संभावित दहशतवादी हल्ले, तोडफोड अश्या घटनांची शंका असेल तर केंद्रीय सुरक्षा एजन्सी कडून प्राप्त होणार्या अहवालानंतर केन्द्रीय गृहमंत्रालय त्याची समीक्षा करते आणि नंतर सुरक्षा द्यायची का, कोणत्या श्रेणीची द्यायची याचा निर्णय घेतला जातो.