सोनाली फोगट प्रकरणात धक्कादायक खुलासा: पीए सुधीर सोनालीची करुन देत होता पत्नी म्हणून ओळख, मोठे सत्य जाणून अधिकारीही थक्क


गुरुग्राम: भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांनी रविवारी गुरुग्राम गाठले. रविवारी दुपारी 2.30 च्या सुमारास गोवा पोलीस सेक्टर-102 मधील गुडगाव ग्रीन सोसायटी परिसरात पोहोचले. टीम थेट सोसायटीच्या चौथ्या टॉवरच्या नवव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅट क्रमांक 901 वर पोहोचली. सोनालीचे पीए सुधीर सांगवान यांनी तीन महिन्यांपूर्वी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. सोनालीचा भाऊ रिंकू आणि मेहुणा अमन पुनिया यांच्यासह अन्य नातेवाईकांच्या उपस्थितीत पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप उघडले. यावेळी सोसायटीबाहेर खासगी सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

22 हजार रुपये भाडे
सुधीर सांगवान सोनालीची ओळख पत्नी म्हणून करुन द्यायचा, असे सांगितले जाते. फ्लॅटचे भाडे 22 हजार रुपये दरमहा होते, त्याचा करार सुधीर सांगवान यांनी केला होता. स्थानिक लोकांनी सांगितले की सुधीर सफारी कारने सोसायटीत आला आणि नंतर कॅबने गोव्याला गेला.

ज्या सफारी कारमध्ये सुधीर आला होता, ती सोसायटीतच उभी आहे. गोवा पोलिसांनी कारमध्ये ठेवलेली कागदपत्रेही तपासली असून ही कार सुधीरची आहे की अन्य कोणाची याचाही तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरडब्ल्यूए सोसायटीचे अध्यक्ष संदीप फोगट यांनीही पोलीस पथकाला पूर्ण सहकार्य केले.

गोवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोवा पोलिसांच्या पथकासह राजेंद्र पार्क पोलिस स्टेशन घटनास्थळी होते. तपासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पश्चिम विभागाचे पोलीस तेथे होते.

सोनालीने केली होती प्रेरणा आणि जाट उदय संस्थान ट्रस्टची स्थापना
भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. असे कळले आहे की एप्रिल 2021 मध्ये सोनालीने पीए सुधीर सांगवान सोबत दोन ट्रस्ट स्थापन केले होते. ज्याचे नाव प्रेरणा आणि जाट उदय संस्थान असे ठेवले. या दोन्ही ट्रस्टची नोंदणी एकाच दिवशी झाली.

ट्रस्टच्या कागदपत्रांमध्ये सोनाली फोगट, सुधीर सांगवान आणि आणखी एक व्यक्ती पदाधिकारी म्हणून दाखवण्यात आली आहे. जेव्हा ट्रस्ट सुरू झाली, तेव्हा सोनाली फोगटने 11-11 हजार रुपये जमा केले होते. या ट्रस्टमध्ये नंतर कोणी पैसे जमा केले की नाही, ट्रस्टने काही काम केले की नाही, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.