IND vs PAK : पाकिस्तानचा कट उघड, खलिस्तानशी जोडले अर्शदीपचे नाव, सरकारने पाठवली विकिपीडियाला नोटीस


नवी दिल्ली : आशिया चषक सुपर-4 फेरीच्या सामन्यात रविवारी (4 सप्टेंबर) भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्सनी पराभव झाला. या पराभवानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग लोकांच्या निशाण्यावर आला आहे. अर्शदीपने 18व्या षटकात आसिफ अलीचा झेल सोडला. तेव्हापासून तो सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. विकिपीडियावरही अर्शदीपचे नाव खलिस्तानशी जोडले गेले आहे. यावर सरकार कडक झाले असून विकिपीडियाच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विकिपीडियाला नोटीस पाठवताना म्हटले आहे की, हे अर्शदीप सिंगच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे देशातील वातावरणही बिघडू शकते. आयपी अॅड्रेस तपासल्यानंतर हे कृत्य पाकिस्तानातील कोणीतरी केल्याचे समोर आले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांनी केले ट्विट
इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले की, भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारची चुकीची माहिती आणि कोणाही व्यक्तीची बदनामी करण्याच्या हेतुपुरस्सर प्रयत्नांना परवानगी नाही. हे सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटच्या सरकारच्या अपेक्षांचे उल्लंघन करते.

अर्शदीपसोबत यापूर्वीही घडले होते असेच
यापूर्वी 2018 मध्ये अर्शदीपच्या प्रोफाइलमध्ये त्याचे वर्णन खलिस्तानी संघाचा सदस्य म्हणून करण्यात आले होते. त्यानंतरही हे कृत्य एका पाकिस्तानी नागरिकाने केले होते. अर्शदीप अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.

रबजान सिंग यांनी ट्रोल करणाऱ्यांचा निषेध केला
माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी ट्विट करून अर्शदीप सिंगचा बचाव केला. त्याचवेळी ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तरुणांनी अर्शदीपवर टीका करणे थांबवावे, असे ते म्हणाले. कोणीही जाणूनबुजून झेल सोडत नाही. आम्हाला भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. पाकिस्तान चांगला खेळला आहे. संघ आणि अर्श यांच्याबद्दल ज्या वाईट गोष्टी घडत आहेत, त्या लज्जास्पद आहेत.