मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबई दौऱ्यावर आहेत. सोमवारी लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीत सांगितले की, उद्धव ठाकरेंचा पक्ष लहान असण्यामागे स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचा सत्तेचा लोभ आहे, भाजप नाही.
BMC Elections : उद्धव ठाकरेंना दिले होते का मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन ? अमित शहांचे मोठे वक्तव्य, महानगरपालिकेबाबत वर्तवले भाकीत
अमित शहा म्हणाले की, राजकारणात फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आज मी पुन्हा सांगू इच्छितो की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन आम्ही कधीच दिले नव्हते. आपण छाती ठोकून राजकारण करणारी माणसे आहोत, बंद खोलीत नाही. उद्धव ठाकरे ख्याली पुलाव शिजवत होते. विशेष म्हणजे जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपशी युती केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवे सरकार स्थापन केले. सत्ता गमावल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपने आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेचा विश्वासघात केल्याचा दावा त्यांनी केला होता.
केंद्रीय गृहमंत्र्यांची महापालिका निवडणुकीबाबत भविष्यवाणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि मूळ शिवसेना युतीने महानगरपालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. जनता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपसोबत आहे, विचारधारेशी गद्दारी करणाऱ्या उद्धव पक्षासोबत नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केवळ विश्वासघातच केला नाही, तर विचारधारेशीही विश्वासघात केला आणि महाराष्ट्रातील जनतेच्या जनादेशाचाही अवमान केला. महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना शिवसेनेचा सफाया करायचा आहे, असे अमित शहा यांनी बैठकीत स्पष्ट केले.