असे होते सायरस, सुस्वभावी आणि अतिशय साधे
२३ नोव्हेबर २०११ बुधवारी देश दुनियेत एक अशी बातमी आली ज्यामुळे जगभरातील अनेक विभागात आश्चर्य व्यक्त केले गेले. या दिवशी टाटा समूहात रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा केली गेली आणि हा उत्तराधिकारी टाटा परिवारातला नव्हता तर तो होता ४३ वर्षीय सायरस मिस्री,कंपनीचा सर्वात तरुण अध्यक्ष. त्यांच्या नावाची घोषणां झाली आणि शेअर बाजाराने एकदम उसळी मारली. टाटाची मार्केट कॅप ५२०० कोटींनी वाढली. २८ डिसेंबर २०१२ रोजी सायरस यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली पण अपेक्षेनुसार त्यांना उत्तम कामगिरी बजावता आली नाही आणि २०१६ मध्ये या पदावरून त्यांना हटविले गेले.
सायरस यांची राहणी अतिशय साधी होतीच पण ते स्वभावाने दिलखुलास आणि मनमिळावू होते असे त्यांना ओळखणारे सांगतात. रतन टाटा यांच्या प्रमाणेच ते थोडेसे लाजाळू होते आणि त्यांच्या वर्तनात कुठेही दिखाऊपण नव्हता. अध्यक्ष पदी निवड झाल्यावर दुसरे दिवशी जेव्हा ते सूत्रे हाती घेण्यासाठी बॉम्बे हाउस मध्ये आले तेव्हा साधा शर्ट पँट अश्या वेशात होते आणि स्वागताला आलेले मात्र सूटबुटात होते अशी आठवण सांगितली जाते. त्यांची निर्णय क्षमता उत्तम होती आणि व्यवसायाची गणिते पक्की होती. लोकांच्या भेटीगाठी घेताना ते अतिशय शांतपणे वावरत असत.
रतन टाटा यांनी सायरस यांची अध्यक्षपदी निवड हा चांगला आणि दुरदर्शी पणाचा निर्णय असल्याचे बोलून दाखविले होते. टाटा समुहाच्या उत्तराधिकार्याची निवड हा तसा अवघड विषय होता. त्यासाठी जी समिती नेमली गेली त्यात सायरस यांचा समावेश होता. जगभरातील अनेक व्यक्तींच्या त्यासाठी मुलाखती झाल्या त्यात नोएल टाटा यांच्यासह इंद्रा नूयी यांचाही समावेश होता. त्यांच्या कामाच्या पद्धती, अनुभव, योग्यता या साऱ्यांचा विचार केला गेला तेव्हा सायरस त्यात उत्तम ठरले होते.
शापूरजी पालनजी मिस्री ग्रुप ही देशातील जुनी आणि विश्वसनीय कंपनी. १०० वर्षे जुनी. मुंबईची पाणी गरज भागविणारा मलबार हिल रिझर्वायर, आरबीआय भवन, एचएसबीसी भवन, ब्रेबोर्न स्टेडीयम, दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम, ताज कॉन्टिनेंटल अश्या अनेक इमारती या समूहाने बांधल्या. सायरस या कंपनीचे संचालक होते. सायरस या पाच अक्षरी ग्रीक नावाचा अर्थ ईश्वराचे रूप किंवा सूर्य असा आहे. पर्शिया मध्ये या नावाचे अनेक राजे होऊन गेले.