Sonali Phogat Murder : सोनाली फोगट खून प्रकरणात मोठा खुलासा, पीए सुधीर सांगवानने दिली गुन्ह्याची कबुली


नवी दिल्ली : सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान याने दिल्याची माहिती गोवा पोलिस सूत्रांनी दिली आहे. कोठडीत चौकशीदरम्यान सोनाली फोगटला गुडगावहून गोव्यात आणण्याचा कट रचल्याची कबुली सुधीर सांगवानने दिल्याचा दावा गोवा पोलिस सूत्रांनी केला आहे. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लान नव्हता, गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे पोलिसांनी सांगितले

गोवा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता. दरम्यान, या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोवा पोलिसांनी पुष्टी केली आहे की सर्व संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि सुधीर सांगवान खून प्रकरणात दोषी ठरविण्यासाठी हे पुरेसे आहेत. सोनाली फोगटच्या हत्येतील आरोपींना जबाबदार धरण्यासाठी खटल्यादरम्यान न्यायालयात ते पुरेसे आणि मजबूत असेल, असा विश्वास गोवा पोलिसांना आहे.

आज सांगवानच्या घरी भेट देऊ शकतात गोवा पोलीस
गोवा पोलीस आज आरोपी सुधीर सांगवानच्या रोहतक येथील घरीही भेट देऊ शकतात असे वृत्त आहे. यादरम्यान सुधीर सांगवान यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाऊ शकते. याशिवाय सुधीरच्या घराचीही झडती घेता येईल. सोनाली फोगटचे भाऊ वतन ढाका आणि रिंकू ढाका यांनी सांगितले की, त्यांचे गोवा पोलिसांशी बोलणे झाले असून त्यांनी आज रोहतक येथील सुधीर सांगवान यांच्या घरी चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती दिली आहे. गोवा पोलीस फक्त हिसारमध्ये हजर आहेत. सुधीर सांगवान यांच्या घरी जाऊन गोवा पोलीस आज आणखी काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात. सध्या गोवा पोलीस लाल डायरीचा तपास करत आहेत.

सोनाली फोगटचा संशयास्पद मृत्यू
23 ऑगस्ट रोजी गोव्यात सोनाली फोगटचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोनाली फोगटच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या प्रकरणी सोनाली फोगटचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी नंतर कुर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आणि दोन ड्रग्ज तस्करांनाही अटक केली आहे.