Covishield: ‘कोव्हिशिल्डमुळे झाला माझ्या मुलीचा मृत्यू, हवी 1 हजार कोटींची भरपाई’… सीरम आणि बिल गेट्सला हायकोर्टाची नोटीस


मुंबई: एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोव्हिशिल्ड लसीला जबाबदार धरले आणि लस कंपनीकडून 1,000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना पक्षकार बनवले आहे. गेट्स फाउंडेशनने SII कंपनीसोबत भागीदारी केली. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट रोजी याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. 17 नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मार्च 2021 मध्ये झाला होता स्नेहलचा मृत्यू
याचिकाकर्त्याने दावा केला की त्यांची मुलगी स्नेहल लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती आणि ती आरोग्य सेविका असल्याने 28 जानेवारी 2021 रोजी तिच्या नाशिक येथील महाविद्यालयात SII ने तयार केलेली कोविड लस कोव्हिशिल्ड घेण्यास भाग पाडले होते. याचिकेनुसार, काही दिवसांनंतर स्नेहलला तीव्र डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी सांगितले की, मेंदूतून रक्तस्त्राव होत आहे. स्नेहलचा 1 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

ही याचिका 2 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवरील केंद्र सरकारच्या समितीने (AEFI) सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे, ज्यात कथितपणे कबूल करण्यात आले की तिची मुलगी कोव्हिशिल्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मरण पावली आहे. याचिकेत SII कडून रु. 1,000 कोटी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.