मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली 12 MLC जागांसाठी उद्धव यांची यादी नाकारण्याची मागणी


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी सुचवलेली 12 नावे रद्द करण्याची विनंती केली आहे. एका सूत्राने शनिवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल शिंदे यांच्या विनंतीला मान्यता देतील आणि हा ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी (एमव्हीए) मोठा धक्का असेल. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार राज्यपालांना एमएलसी म्हणून नियुक्त करण्यासाठी 12 लोकांची यादी सादर करणार आहे.

राज्यपालांना नवी यादी देणार आहेत शिंदे सरकार
माहितीनुसार, एका सूत्राने सांगितले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाविकास आघाडीने एमएलसी म्हणून नियुक्त करण्यासाठी सुचवलेली नावे मागे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपकडून राज्यपालांना नवीन यादी दिली जात आहे. राज्यपालांनी विधान परिषदेवर नियुक्त केलेले 12 सदस्य कोण असतील याचा निर्णय आता शिंदे गट आणि भाजप घेतील. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शिंदे आणि 39 शिवसेना आमदारांनी बंड करून ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर दोन महिन्यांनी हे पाऊल उचलले आहे.

महाविकास आघाडी सरकारने दोनदा सादर केली होती राज्यपालांना यादी
आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात, महाविकास आघाडी सरकारने एमएलसी उमेदवारांची यादी दोनदा दिली होती, परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी तांत्रिक किंवा कायदेशीर समस्यांचा हवाला देऊन ती स्वीकारण्यास नकार दिला होता. वादात अडकल्यानंतर हे प्रकरण कोर्टातही पोहोचले. महाविकास आघाडी सरकारने तेव्हा आरोप केला होता की कोश्यारी हे भाजपच्या वतीने काम करत आहेत, जे राज्यात विरोधी पक्षात आहेत, परंतु केंद्रात सत्तेत आहेत.