शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे दोघांनीही पाठवले अर्ज, कोणाला मिळणार परवानगी?


मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात मुंबई महापालिकेने शुक्रवारी सांगितले की, शिवाजी पार्कचे “बुकिंग” करण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. हा मेळावा शिवसेनेच्या राजकीय दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम मानला जात असून पक्षाची ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. मात्र शिंदे यांनी जूनमध्ये शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने यंदा या मेळाव्यासाठी दोन दावेदार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आम्हाला गेल्या महिन्यात दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क बुक करण्यासाठी दोन अर्ज आले होते. पहिला अर्ज 22 ऑगस्टला शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठवला होता आणि दुसरा अर्ज शिंदे गटाने गणेशोत्सवाच्या आधी पाठवला होता. या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, अद्याप कोणत्याही अर्जावर निर्णय झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच आपला पक्ष शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

त्याचवेळी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी रॅलीसाठी पक्षाचा अर्ज मंजूर करण्यात अडचण आल्याचा आरोप केला होता. 1966 मध्ये शिवाजी पार्कवर पहिला मेळावा झाला होता, ज्याला शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी संबोधित केले होते. या रॅलीत राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतात.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि उद्धव गट आमनेसामने आहेत. या मेळाव्याबाबत सूत्रांनी एबीपी न्यूजला सांगितले की, शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याचे प्रमुख पाहुणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे असू शकतात. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव गटाने 22 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. हे दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवून घेत असले तरी खऱ्या शिवसेनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.