भारतीय संघाला मोठा धक्का, रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर


दुबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर झाला आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. मंडळाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. टीम इंडिया सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. संघाचा पुढील सामना रविवारी होणार आहे.

अक्षर पटेलला मिळाली जागा
रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. अक्षर स्टँडबाय खेळाडूंमध्ये होता. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, तसेच जडेजासारखा डावखुरा फलंदाज आहे. अक्षरने वेस्ट इंडिज दौऱ्यावर फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव एका क्षणी निश्चित वाटत होता, मात्र अक्षरने 35 चेंडूत 64 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

फॉर्ममध्ये होता रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा बॉलसोबतच बॅट आणि फिल्डिंगमध्येही कमाल करत होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना 35 धावा केल्या होत्या. डावखुऱ्या फिरकीपटूचा मुकाबला करण्यासाठी भारतीय संघाने त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याची फलंदाजी आली नाही, पण चेंडू आणि क्षेत्ररक्षणात त्याने कमाल केली. त्याच्या थेट थ्रोवर हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खान धावबाद झाला. गोलंदाजीतही त्याने 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या.

आशिया कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.