विराट बनला अलिबागकर, फार्म हाउससाठी घेतली जमीन

टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहली आता अलिबागकर बनण्याच्या तयारीला लागला आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी विराटने अलिबाग जीराड येथे ८ एकर जमीन खरेदी केली असून येथे अलिशान फार्म हाउस बांधले जाणार आहे. १९ कोटी २५ लाख रुपये किंमतीच्या या जमिनीसाठी १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपये मुद्रांक शुल्क भरले गेल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार विराटने ही जागा सहा महिन्यापूर्वीच पसंत केली होती. मात्र सध्या त्याला अजिबात फुरसत नाही, तो दुबई मध्ये आशिया कप खेळण्यात व्यग्र आहे त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी होणारा जमिनीचा सौदा होऊ शकला नव्हता. अखेर विराटचा भाऊ विकास याला विराटने पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्यावर विकासने सौदा पूर्ण करून विराटच्या नावाने जागेची नोंदणी केली. समीरा हॅबीटेटस रियल इस्टेट एजन्सी कडून ही जमीन खरेदी केल्याचे समजते.

विशेष म्हणजे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी १० वर्षांपूर्वी याच भागात फार्म हाउस बांधले आहे तर रोहित शर्मा याच भागात तीन एकर जमिनीवर फार्म हाउस बांधत आहे. हार्दिक पंड्या आणि यजुवेन्द्र चहल अलिबाग मध्ये जागा खरेदी साठी उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. ई टाईम्सच्या रिपोर्टनुसार विराटने मुंबईच्या जुहू भागात पार्श्वगायक,दिवंगत किशोर कुमार यांच्या बंगल्याचा काही भाग लीजवर घेतला आहे आणि तेथे रेस्टॉरंट सुरु केले जाणार आहे. पाच वर्षाच्या करारावर ही जागा घेतली गेल्याचे समजते.