गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला जाणार नाहीत पुतीन

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे युएसएसआरचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे क्रेमलिन कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. गोर्बाचेव्ह यांचे सोमवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले असून ते दीर्घकाळ आजारी होते. त्यांचे अंत्यसंस्कार या आठवड्यात होणार आहेत. क्रेमलिन कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले, गुरुवारी पुतीन यांनी गोर्बाचेव्ह यांचे पार्थिव ठेवलेल्या हॉस्पिटलला भेट देऊन गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोर्बाचेव्ह यांचे अंत्यसंस्कार राजकीय इतमामाने पार पाडले जातील असेही त्यांनी सांगितले.

गोर्बाचेव्ह हे वादग्रस्त पण प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांच्या काळात प्रसिध्द होते. अमेरिकेबरोबर सुरु असलेले शीतयुद्ध रक्ताचा एक थेंबही न सांडता संपुष्टात आणण्याचे श्रेय गोर्बाचेव्ह यांना दिले जाते. त्याबद्दल गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविले गेले होते. मात्र सोविएत रशियाचे विभाजन गोर्बाचेव थांबवू शकले नाहीत. गोर्बाचेव सोविएत रशियाचे आठवे आणि शेवटचे राष्ट्रपती होते. पुतीन यांच्या बरोबर त्यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते असेही म्हटले जाते. सोविएत युनियनचे विभाजन हा गोर्बाचेव नीतीचा परिणाम असल्याचे पुतीन यांचे मत आहे.

रशियाचे विभाजन झाल्यामुळे रशिया कमजोर झाला, देशाची अर्थव्यवस्था ढासळली याचे खापर गोर्बाचेव्ह यांच्यावर फोडले जाते. गोर्बाचेव्ह यांनी सत्तेवर येताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि मिडिया व कलाजगताला स्वातंत्र्य दिले. कम्युनिस्ट पकड सैल व्हावी म्हणून त्यांनी रशियामध्ये अनेक क्रांतीकारी सुधारणा केल्या. हजारो क्रांतीकारीना तुरुंगातून मुक्त केले होते. यामुळे पुतीन नेहमीच गोर्बाचेव यांच्या विरोधात होते.