ऑस्ट्रेलियातील विषारी गाव आता पूर्ण रिकामे

ऑस्ट्रेलियाच्या विटनूम पिलबरा भागातील वसाहत आता पूर्ण रिकामी केली गेली असून हा विषारी भाग आता पूर्ण निर्जन झाला आहे. इतकेच नव्हे तर जगाच्या नकाशावरून हे ठिकाण काढून टाकले जाणार आहे. मानवामुळे विनाशाच्या गर्तेत सापडलेल्या या गावाच्या विषारी हवेने आजवर हजारो लोकांचे जीव घेतले आहेत.

द सन मधील रिपोर्ट नुसार या गावात पहिली वसाहत  १९४१ मध्ये खाणकामासाठी झाली. खाणीसाठी खोदकाम सुरु झाल्यावर पृथ्वीच्या पोटातील अनेक विषारी वायू येथे बाहेर पडू लागले आणि त्यामुळे हळूहळू येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. १९६६ मध्ये या भागातील नागरिकांना अनेक आरोग्य समस्या आल्याच पण मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. नंतर ही खाण बंद केली गेली तरी येथील रहिवासी हा भाग सोडून बाहेर पडण्यास तयार झाले नाहीत. शेवटी ३१ ऑगस्ट पर्यंत जागा खाली केली नाही तर जबरदस्तीने बाहेर काढले जाईल असा इशारा दिला गेला आणि त्यानुसार ही जागा रिकामी केली गेली.

या भागात राहणाऱ्या दर १० माणसांमागे एक मृत्यू विषारी हवेमुळे होत होता. खाण बंद केल्यावर कुणी खाण कामगार येथे नव्हते तरी तेव्हा सुमारे २ हजार नागरिकांचा मृत्यू ओढवला होता. २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया सरकारने या गावाचा दर्जा रद्द केला होता असेही समजते.