कोण कोण आहेत सोनिया गांधींच्या माहेरी?

देशातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि गांधी परिवार सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. सोनिया गांधी मुळच्या इटालियन आहेत.  सोनिया यांच्या आई पाओला मायनो यांचे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले आणि २८ ऑगस्ट रोजी त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्याला सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी उपस्थित होते. त्यांच्या माहेरच्या  व्यक्ती नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत.  सोनिया यांच्या माहेरी त्यांना नक्की कोण कोण नातेवाईक आहेत याची उत्सुकता नेहमीच होती.

सोनिया वेनेतो शहरात वाढल्या. त्यांचे वडील स्टेफनो आणि आई पाओला. हे रोमन कॅथोलिक कुटुंब नंतर टयूरीनच्या ओरबासानो येथे गेले. तेथेच सोनिया यांचे शिक्षण झाले आहे. त्यांना एक मोठी आणि एक धाकटी बहिण आहे. मोठी बहिण नादिया स्पेन मधील राजकीय व्यक्तीशी विवाहबद्ध झाली असून स्पेनमध्येच राहते. धाकटी अनुष्का इटली मधेच असून तिच्या मुलीचे म्हणजे अरुणाचे भारतीय उत्पादन विक्रीचे दुकान आहे.

सोनिया यांचे वडील स्टेफनो इटलीचा नेता मुसोलिनी याचे समर्थक होते. मुसोलिनी आणि हिटलर यांची युती झाल्यावर स्टेफनो दुसर्या महायुद्धात रशिया बरोबर लढण्यासाठी गेले होते आणि रशियाने त्यांना युध्दबंदी बनविले होते. तेथून सुटून आल्यावर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरु केला आणि त्यात चांगले यश मिळविले. राजीव गांधी यांच्याशी विवाह करण्यास त्यांचा विरोध नव्हता. मात्र राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर पाओला यांनी सोनिया यांच्या जीवाला धोका होईल अशी भीती वाटल्याने दोन्ही मुलांना घेऊन इटलीला ये असा आग्रह धरला होता.मात्र सोनिया यांनी त्यांना’ आता मला इटली पेक्षा भारतीय म्हणून राहणे अधिक चांगले वाटते , असे सांगितले होते असे म्हणतात.