‘काला चष्मा ‘ फेमस पण त्याचा जनक नक्की कोण !

‘गोरे गोरे गालोपे काला काला चष्मा’ हे तुफान लोकप्रिय ठरलेले बॉलीवूड गाणे आता गणपती उत्सवात पुन्हा जोर जोराने ऐकू येऊ लागले आहे. वास्तविक गॉगल, सनग्लासेस अश्या अन्य नावाने प्रसिद्ध झालेले हे उत्पादन जगात इतके लोकप्रिय ठरेल याची कल्पना त्याच्या जनकाला होती वा नाही कुणास ठाऊक! आज जगात सनग्लासेस एक क्रेझ बनून राहिले आहेत आणि शौक म्हणून सुद्धा महागडे गॉगल्स तुफान खरेदी केले जात आहेत. बॉलीवूड मध्ये तर या थीमवरची अनेक गाणी आली आणि ती लोकप्रिय सुद्धा झाली.

प्रत्यक्षात या काला काळा चष्माचा जनक कोण यावर थोडा गोंधळ आहे. साधा चष्मा १३ व्या शतकात १२८२-१२८६ या काळात इटलीच्या अलैसेन्द्रो डी स्पिना व सल्विनो डीली आर्मटी यांनी तयार केला असे म्हणतात. मात्र अनेक ठिकाणी  स्पिना हाच चष्म्याचा जनक मानला जातो. उन्हाच्या त्रास होऊ नये म्हणून १२ व्या शतकात चीन मध्ये सर्वप्रथम पारदर्शी दगडाला धुराचा लेप चढवून चष्मा तयार केला गेला असाही दावा केला जातो. याला फ्रेम असा खास प्रकार नव्हता पण श्रीमंतांनाच तो परवडत असे. चीन मध्ये न्यायाधीश असे चष्मे वापरत. त्यामागचे कारण म्हणजे निकाल देताना न्यायाधीशांच्या डोळ्यातील भाव बाहेर दिसू नयेत हे होते.

१४३० मध्ये मात्र गडद रंगांच्या काचा असलेले नंबरचे चष्मे इटली मध्ये तयार केले गेले. चीन मधूनच हे तंत्र इटलीला पोहोचले असे म्हणतात. १८ व्या शतकात जेम्स आईसकफ याने रंगीत लेन्स बनविले पण त्याचा उपयोग उन्हापासून बचाव म्हणून नाही तर दृष्टी सुधारण्यासाठी म्हणून केला जात होता. हे लेन्स फक्त हिरव्या नी निळ्या रंगाचे होते. २० व्या शतकात काळ्या रंगांचे गॉगल्स आले आणि हॉलीवूड स्टार्सनी त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली.

१९२८ मध्ये सॅम फोस्टर कंपनीने त्यांचे उत्पादन सुरु केले आणि १९३० मध्ये सर्व रेंज मध्ये ते उपलब्ध झाले. आर्मी , एअरफोर्स साठी खास उन्हाळी सन ग्लासेस बनले मात्र ते पिवळ्या रंगाचे होते. दुसर्या महायुद्धानंतर अँटी ग्लेअर काचा आल्या आणि १९६० पासून आजतागायत त्यांची क्रेझ कमी झालेली नाही.