सन रुफ फिचरचे हे आहेत उपयोग आणि हे आहेत धोके
आजकाल कार खरेदी करताना सनरुफ फिचर असलेली कार घेण्यास अनेकांची पसंती दिसते. अर्थात कोणतीही कार खरेदी करताना कारची फिचर विचारात घेतली जातात आणि या विविध फीचर्स मुळे पुष्कळ फायदेही मिळतात. सनरुफ कार बद्दल बाजारात सध्या क्रेझ आहे. पण असेही दिसून येते कि सनरुफचे मुख्य उपयोग अनेकांना माहिती नाहीत. योग्य वापर झाला तर हे फिचर नक्कीच उपयुक्त आहे आणि चुकीचा उपयोग केला तर ते धोकादायक सुद्धा आहे.
सनरुफ असलेल्या कार्स दिसायला छान दिसतात हे खरेच. पण भारतात बहुतेक वेळा सनरुफ मधून बाहेर येऊन शाईन मारणे हाच त्याचा उपयोग होताना दिसतो. लहान मुलांपासून तरुण पिढी पर्यंत सर्वाना हा मोह आवरता येत नाही. पण ही कृती फार धोकादायक ठरू शकते.
सनरुफचा मुख्य उद्देश नैसर्गिक प्रकाश अधिक प्रमाणात कार मध्ये यावा हा आहे. खिडकी मधून खूप प्रकाश येऊ शकत नाही. शिवाय उन्हामध्ये कार पार्क केलेली असेल तर तापलेली गाडी आणि आतली हवा थंड करण्यासाठी सुद्धा सनरुफचा वापर होतो. गाडी तापलेली असेल तर थोडा वेळ सनरुफ उघडले तर गरम हवा बाहेर निघून जाते आणि कार लवकर थंड होते. शिवाय सनरुफ असलेल्या कार मध्ये अधिक मोकळे वाटते हाही फायदा आहे.
पण स्टाईल स्टेटमेंट म्हणून सनरुफ मधून अर्धे शरीर बाहेर काढणे अत्यंत चुकीचे आहे. कार वेगाने जात असताना असा प्रकार केला तर जीवावर बेतू शकते. अनेकदा अचानक ब्रेक लावावे लागतात अश्या वेळी सनरुफ उघडून कुणी बाहेर आले असेल तर जखमी होण्याची भीती असते. अनेकदा कार बाहेर फेकले जाण्याची भीती सुद्धा असते. त्यामुळे या फिचरचा योग्य तोच वापर केला जावा अशी अपेक्षा तज्ञ व्यक्त करतात.