यंदा हमरापूर मध्ये बनल्या ३ कोटी गणेश मूर्ती
गणपती उत्सव देशात आणि महाराष्ट्रात जोरदार साजरा होत आहे. महाराष्ट्रातील पेणच्या गणेश मूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत. पेण जवळच हमरापूर हे ४१८ उंबऱ्यांचे गाव असून यंदा या गावात ३ कोटी गणेश मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. करोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा गणपती मध्ये या गावाचा व्यवसाय ९० कोटींवर गेल्याचे सांगितले जात आहे. हमरापूर हे छोटेसे गाव गणपती मार्केट म्हणून प्रसिद्धीस आले आहे.
केवळ ४१८ घरे असलेल्या या गावात गणपती बनविण्याचे ५०० कारखाने आहेत. म्हणून या गावाची जगाच्या नकाशात ‘इंडिया गणेश मार्केट’ अशी ओळख आहे. नवरात्र संपत आले कि पुढील वर्षाच्या गणपतीची तयारी येथे सुरु होते. ऐन सिझन मध्ये तर येथील कामगारांना क्षणाची उसंत नसते. केवळ महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेश, गुजरात, छत्तिसगढ, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रप्रदेश राज्यात या गणेश मूर्तींना मोठी मागणी असतेच पण अमेरिका, जपान, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन सह अनेक देशात येथील मूर्ती जहाजातून अथवा विमानाने रवाना होतात. येथील प्रत्येक घराचा गणपती निर्मिती मध्ये सहभाग असतो.
नोकरी व्यवसायानिमित्ताने परगावी असलेले सदस्य सुद्धा रजा घेऊन या दिवसात गणपती तयार करण्याच्या कामी मदतीला येतात. या छोट्या गावात १० हजार लोकांना रोजगार मिळाला असून त्यात राजस्थान, गुजराथ मधील कारागीर सुद्धा सहभागी आहेत. देशभरात २५ ते ३० लाख रोजगार या क्षेत्रात आहेत.
शाडू, नारळाच्या शेंड्या आणि प्लास्टर ऑफ पॅरीस पासून येथे ५ इंच पासून २० फुटापर्यंत मूर्ती बनतात. त्यांच्या किंमती १५० रुपयांपासून दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत असतात. येथे गणपती कामगार युनियन आहे. गणेश मूर्तीचा साचा, पहिला रंग, पॉलिश, फायनल टच आणि मग दागिने रंगविणे या स्वरुपाची विविध कामे करणारे कुशल कारागीर आहेत. कच्चा माल महाग झाल्याने मूर्ती किंमती थोड्या वाढल्या आहेत. पण येथील सरपंच सांगतात ,’आमच्या कडे ५०० रुपयाला मिळणारी मूर्ती पुण्यात जाईपर्यंत वाहतूक,अन्य खर्च व विक्री नफा धरून १५०० रुपयांना पडते.’