ट्रम्प यांच्या ‘मार ए लागो’ हवेलीवर लगीनघाई

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या लाडकी लेक टिफनी हिच्या विवाहाच्या तयारी मध्ये मग्न आहेत. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार ए लागो हवेलीत लगीनघाई सुरु झाली आहे. याच मालमत्तेवर एफबीआयने नुकतेच छापे टाकले होते आणि त्यामुळे ही हवेली सध्या चर्चेत आहेच. अमेरिकी मिडीया नुसार ट्रम्प जातीने विवाहाच्या तयारीवर लक्ष ठेऊन आहेत. १२ नोव्हेंबर रोजी हा विवाह सोहळा होणार आहे. टिफनी ट्रम्प व्यवसायाने वकील आहे आणि तिचा नियोजित वर मायकल बोलोस हा नायजेरियाची राजधानी लागोस येथील अब्जाधीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. या दोघांची ओळख टिफनी आणि मायकेल एका स्थळी गेले होते तेथे झाली होती.

पेज सिस्क्थच्या रिपोर्टनुसार टिफनी, ट्रम्प यांची सर्वात धाकटी मुलगी आहे. डोनाल्ड यांना एकूण पाच अपत्ये आहेत. टिफनी, ट्रम्प यांची लाडकी कन्या आहे आणि अनेकदा ट्रम्प यांनी टिफनीचा अभिमान वाटतो असे बोलून दाखविले आहे. टिफनी ने ट्रम्प यांना ते व्हाईट हाउस मध्ये असतानाचा मायकेलची ओळख करून दिली होती. येथेच मायकेलने रोझ गार्डन मध्ये टिफनीला १३ कॅरट पाचू हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. या अंगठीची किंमत १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

ट्रम्प यांच्या एरिक आणि लारा यांचा विवाह सुद्धा येथेच झाला होता. टिफनीच्या लग्नाला तिची आई मार्ला येणार आहे. मार्ला आणि डोनाल्ड यांचा घटस्फोट झाला आहे. टिफनी तिची आई मार्ला सोबत राहते. तिची राहणी अगदी साधी असून फार कमी वेळा तिला व्हाईट हाउस वर पाहिले गेल्याचे सांगतात. मार्ला अमेरिकेच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहे.