Maharashtra Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली राज ठाकरेंची भेट, जाणून घ्या काय चर्चा झाली?


मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंगळवारी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बावनकुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास दादरच्या शिवाजी पार्क भागातील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले, तेथे त्यांनी मनसे प्रमुखांची भेट घेतली.


बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी चर्चा केली नाही. महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तथापि, नंतर त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की त्यांनी महाराष्ट्र आणि देशाशी संबंधित विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान एक दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि भाजपने अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही, मात्र शिवसेनेला पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुढे करून भाजपला मराठी मतदारांना आकर्षित करायचे आहे. 2017 च्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 227 जागांपैकी 82 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी होत्या. महाराष्ट्रात अद्याप बीएमसीच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत.