ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात होणार टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना मिळणार जागा


नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. वृत्तानुसार, संघ निवडण्यासाठी पुढील आठवड्यात निवडकर्त्यांची बैठक होणार आहे. इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने निवडकर्ते 18 खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतात.

पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच संघाची घोषणा केली जाईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. 16 सप्टेंबरपूर्वी ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेसाठीही टीम इंडियाची निवड होणार आहे. मात्र, आता संघात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

कर्णधार रोहित शर्मासोबत फक्त केएल राहुल सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसतो. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असतील. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या खेळाडूंनाही मिळू शकते संधी
दीपक हुडाला बॅकअप अष्टपैलू म्हणून संघात ठेवता येईल. युझवेंद्र चहललाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळू शकते.

टीम इंडियाचा नंबर वन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो. सध्या जसप्रीत बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. मात्र, निवडकर्ते बुमराहच्या फिटनेसचा धोका पत्करणार नाहीत आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तरच त्याला संघात स्थान दिले जाईल.

आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अक्षर पटेल आणि इशान किशन हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. मात्र, या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणे खूप कठीण आहे.