तबेल्याचे दूध पाच रुपयांनी महागले, मुंबईकरांना महागाईचा फटका, 1 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर


मुंबई : 1 सप्टेंबरपासून तबेल्यातील ताजे दूध 5 रुपयांनी महागणार आहे. मुंबई दूध उत्पादक संघाने (द बॉम्बे मिल्क प्रॉडक्ट्स असोसिएशन) घाऊक दरात प्रति लिटर 73 ते 78 रुपये वाढ करून महाग केले आहे. त्यावर दोन रुपये वाहतूक खर्च आकारण्यात येणार आहे. म्हणजेच घाऊक दरात थेट 80 रुपये प्रतिलिटर असेल. किरकोळ बाजारात, तबेल्याचे तेच ताजे दूध सर्वसामान्यांना 83 ते 85 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. नवीन दर 1 सप्टेंबर ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

तबेल्याच्या ताज्या दुधाचे दर ठरवण्यासाठी मुंबई दूध उत्पादक संघाची पटेल समाज सभागृहात बैठक झाली. बैठकीत तबेला मालकांनी वाढत्या महागाईचे कारण देत दर वाढविण्याची मागणी केली. दुभत्या जनावरांचे खाद्यपदार्थ महाग झाले असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सी.के. सिंह म्हणाले की, सभेत दुधाच्या दरात खूप वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सर्व सदस्यांनी एकमताने घाऊक दरात 73 रुपयांवरून 78 रुपये प्रतिलिटर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय मालवाहतूक (वाहतुकीसह इतर खर्चासह) 2 रुपये लागू होतील.