कमाल आर खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी झाली होती अटक


स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटसाठी आज सकाळी त्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. बोरिवली न्यायालयाने केआरकेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

2020 मध्ये, केआरकेने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल ट्विट केले होते, ज्यामुळे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य राहुल कानल यांनी केआरकेविरोधात तक्रार दाखल केली होती.

काय केले होते ट्विट
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, केआरकेने 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांच्याबद्दल ट्विट केले होते. रुग्णालयात दाखल असताना त्यांनी हे ट्विट केले होते. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले- ‘सर, बरे व्हा आणि लवकर परत या, निघून जाऊ नका, कारण दोन-तीन दिवसांनी दारूचे दुकान उघडणार आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या काही दिवस आधी अभिनेता इरफान खानने या जगाचा निरोप घेतला. केआरकेने त्याच्यासाठी आक्षेपार्ह टिप्पणीही केली होती, त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

केआरकेने वादग्रस्त ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो दररोज बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असतो. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही काळापूर्वी त्याने सलमान खानच्या राधे या चित्रपटाचे नकारात्मक पुनरावलोकन केले होते, त्यानंतर सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, नंतर केआरकेने सलमानची माफी मागितली. सलमानच्या आधी केआरकेने अनुराग कश्यप, करण जोहर, अजय देवगण यांनाही टार्गेट केले आहे, ज्याला या सेलिब्रिटींनी चोख प्रत्युत्तर दिले.