गौतम अदानी श्रीमंत यादीत जगात तिसऱ्या नंबरवर

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जागतिक धनकुबेर यादीत फ्रांसचे दिग्गज व्यावसायिक बर्नार्ड ऑरनॉल्ट यांना मागे टाकून तिसरे स्थान मिळविले आहे. या स्थानावर झेप घेणारे ते पहिले आशियाई ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्स नुसार ६० वर्षीय अदानी यांची एकूण संपत्ती १३७.४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. याच वर्षात अदानी यांच्या संपत्ती मध्ये ६०.९ अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी मध्ये गौतम अदानी यांनी रिलायंस उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळविला होता. एप्रिल मध्ये अदानी यांची संपत्ती १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली होती आणि गेल्याच महिन्यात त्यांनी मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना धनकुबेर यादीत मागे टाकून चार नंबरवर झेप घेतली होती.

चीन मधील अब्जाधीश जॅक मा आणि भारतातील अज्बाधीश मुकेश अंबानी यांना अजून जागतिक श्रीमंत यादीत या नंबरवर जाता आलेले नाही. मुकेश एकदा या यादीत चौथ्या स्थानावर होते मात्र अदानी यांनी त्यापुढे पाउल टाकल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच अदानी समूहाने त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. हिरे व्यापारापासून सुरु झालेला हा व्यवसाय आता कोळसा खाणी, पोर्टस, विमानतळ व्यवस्थापन, सिटी गॅस डीस्ट्रीब्यूटर, एलुमीना, असा विविध क्षेत्रात विस्तारला आहे. मार्केट कॅपच्या दृष्टीने विचार केला तर अदानी ग्रुप देशातील दोन नंबरचा ग्रुप आहे. २०२० नंतर या ग्रुपच्या काही कंपन्यांच्या शेअर मध्ये १ हजार टक्के वाढ झाली असल्याने अदानी याची संपत्ती रॉकेट वेगाने वाढल्याचे सांगितले जाते.

या यादीत एलोन मस्क पहिल्या स्थानावर असून त्यांची संपत्ती २५२ अब्ज आहे तर दोन नंबरवर असलेल्या जेफ बेजोस यांची संपत्ती १५२ अब्ज आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती ९१.९ अब्ज डॉलर्स असून ते या यादीत ११ नंबरवर आहेत.