देवेंद्र –राज ठाकरे यांची ‘सागर’ भेट, राजकीय चर्चेला उधाण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सोमवारी एक तासापेक्षा अधिक काळ झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. १५ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर राज यांची भेट घेतली होती आणि आता दिड महिन्यानंतर राज ठाकरे देवेंद्र यांच्या भेटीसाठी ‘सागर’ बंगल्यावर आले होते.  राज ठाकरे यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र राज भेटीबाबत अनेक अटकळी वर्तविल्या जाऊ लागल्या आहेत. त्यात आगामी बीएमसी निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.

राज ठाकरे यांनी २३ ऑगस्ट रोजी मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यात बैठक घेऊन मनसे सदस्यता अभियान मोहीम सुरु केली. आता मुंबई बरोबर अनेक शहराच्या महापालिका निवडणुका होणार असल्याने राज देवेंद्र भेटीला वेगळे महत्व दिले जात आहे. अर्थात या दोघांनीही बीएमसी निवडणुकात युती संदर्भात काहीही घोषणा केलेली नसली तरी जागा वाटप चर्चेला नकार दिलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नद्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच मुंबईला भेट देणार असल्याची खबर आहे.

बीएमसी ही देशातील श्रीमंत महापालिकेमधील एक असून शिवसेनेने महाविकास आघाडी ही निवडणूक आघाडी म्हणूनच लढवेल असे जाहीर केले आहे. सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी नुकतीच हातमिळवणी केली आहे तर दुसरीकडे शिंदे गट, भाजप यांनी मुंबई बरोबरच ठाणे व अन्य शहरात स्थानिक निवडणुका लढविण्याची तयारी सुरु केली आहे.