इंद्रधनुष्याविषयी काही रोचक माहिती

सुरवातीचा किंवा सरता पावसाळा आणि इंद्रधनुष्य यांचे विशेष नाते आहे, निळ्या किंवा काळ्या आकाशात दिसणारे सुंदर इंद्रधनुष्य हा निसर्गाचा अनोखा अविष्कार आहे. आजही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व आकाशात इंद्रधनुष्य दिसत असेल तर आवर्जून पाहतात, फोटो काढले जातात. या इंद्रधनुष्याबद्दल काही रोचक माहिती खास आमच्या वाचकांसाठी

इंद्रधनुष्यात सात रंग असतात हे आपण शाळेपासून शिकलो आहोत. पण प्रत्यक्षात इंद्रधनुष्य अनेक रंगांचे बनलेले असते. जसे स्पेक्ट्रम म्हणजे विविध लांबीचे तरंग तसेच लाखो रंगांचे तरंग इंद्रधनुष्यात असतात. फक्त ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. बहुतेक वेळा आपल्याला इंद्रधनुष्याचा थोडा भाग किंवा कधी तरी अर्धकमान दिसते. पण अर्धकमान म्हणजे पूर्ण इंद्रधनुष्य नसते तर क्षितिजाखालचा भाग आपल्याला दिसत नाही. उंच आकाशात जाऊन इंद्रधनुष्य पहिले तर ते पूर्ण दिसू शकते. अनेकदा आकाशात पूर्ण गोल इंद्रधनुष्य सुद्धा दिसते.

पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणे ४२ अंशाचा कोन साधून परावर्तीत होत असली कि इंद्रधनुष्य तयार होते. त्यासाठी पाउस हवाच असे मात्र नाही. धबधब्याचे तुषार उडताना तेथेही ४२ अंशाच्या कोनातून सूर्यकिरणे परावर्तीत झाली तरी इंद्रधनुष्य दिसते. पण पावसात ते अधिक प्रमाणात दिसते म्हणून त्याला रेनबो म्हटले जाते.

कधी कधी रात्री सुद्धा इंद्रधनुष्य दिसते. यात सूर्याऐवजी चंद्र किरणे परावर्तीत होतात. याला ‘मूनबो’ असे म्हणतात. इंद्रधनुष्य कधी कधी एकावर एक अशी दोन दिसतात तर कधीकधी तिहेरी इंद्रधनुष्य सुद्धा दिसते. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत २०० इंद्रधनुष्य दिसण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.