नीरज चोप्राचा भाला वाढवणार ऑलिम्पिक संग्रहालयाची शोभा, भेट देताना भारतीय खेळाडूने सांगितले ही खास गोष्ट


नीरज चोप्राचा टोकियो 2020 सुवर्णपदक जिंकणारा भाला आता ऑलिम्पिक संग्रहालयाची शोभा वाढवणार आहे. स्वित्झर्लंडमधील लॉसने येथील ऑलिम्पिक संग्रहालयाला त्याने आपला खास भाला भेट दिला आहे. यादरम्यान नीरजने असेही म्हटले आहे की, ऑलिम्पिक संग्रहालयात या भाल्याची उपस्थिती तरुण पिढीला प्रेरणा देईल.

या खास प्रसंगी नीरजसोबत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राही उपस्थित होता. नीरजने ट्विटमध्ये लिहिले की, ऑलिम्पिक म्युझियमला भेट देणे आणि तेथे माझा टोकियो 2020 भाला दान करणे हा मोठा सन्मान आहे. मला आशा आहे की भाला तिथे असल्यामुळे तरुण पिढीला त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळेल. हा प्रसंग आणखी खास होता कारण यावेळी अभिनव बिंद्रा सरही माझ्यासोबत होते. अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी रायफल देखील याच संग्रहालयात ठेवली आहे.


नीरजने भारताला मिळवून दिले ट्रॅक आणि फील्डमध्ये पहिले सुवर्ण
नीरज चोप्राने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी ट्रॅक आणि फील्डमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. यंदाच्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही त्याने इतिहास रचला होता. येथे त्याने रौप्यपदक पटकावले. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत भारताला पदक मिळवून दिले होते.