सप्टेंबरपासून सुरू होणार बेस्टची प्रीमियम बससेवा, जाणून घ्या – भाडे, मार्ग आणि बुकिंगशी संबंधित महत्त्वाची माहिती


मुंबई: मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लक्झरी बसमधून प्रवाशांना लवकरच प्रवास करता येणार आहे. सुरुवातीला ठाणे-दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई-दक्षिण मुंबई दरम्यानच्या महत्त्वाच्या कार्यालयीन मार्गांवर बेस्टच्या दहा प्रीमियम बसेस धावतील. विशेषत: ऑफिसला जाणाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या या सेवेत प्रवाशांना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे बसमध्ये जागा आरक्षित करता येणार आहेत. यामध्ये चलो अॅपद्वारे बुकिंग केले जाईल. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना यामध्ये किमान 10 किलोमीटरचे अंतर बुक करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 200 लक्झरी बसेस दाखल करण्यात येणार असून 2024 पर्यंत अशा सुमारे 2,000 बसेस दाखल करण्याची बेस्टची योजना आहे.

अॅपमध्ये असेल हे खास फीचर
लवकरच लाँच होणाऱ्या अॅपमध्ये ‘होम रीच’ वैशिष्ट्य देखील असेल, ज्यामध्ये प्रवासी त्यांच्या घराचा पत्ता आणि थेट स्थान सक्रिय करू शकतात. बेस्ट कंट्रोल रूम प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि निर्धारित वेळेत ते त्यांच्या घरी पोहोचले नाहीत, तर कंट्रोल रूम प्रवाशांना फोन करून त्यांचा ठावठिकाणा तपासेल. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, ठाणे ते दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई दरम्यानच्या कार्यालयीन मार्गांवर बससेवा सुरू केली जाईल.

एवढे असू शकते अंदाजे भाडे
बस सेवा केवळ कार्यालयीन वेळेत चालविली जाईल आणि खाजगी वाहने आणि खाजगी बसने प्रवास करणाऱ्यांना आकर्षित करण्याचा बेस्टचा उद्देश आहे. बससेवेचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु मोबाइल अॅप्लिकेशनवर आधारित कॅब आणि खासगी बसेसच्या तुलनेत ते स्वस्त असेल, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बसचे भाडे प्रतिकिलोमीटर चार ते पाच रुपये असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.