या भित्र्या प्राण्याने ऑस्ट्रेलिया सरकारला आणले जेरीला

गेल्या दशकापासून ऑस्ट्रेलिया सरकारला एक मोठे आव्हान दिले जात असून हे आव्हान एका अतिशय भित्र्या मानल्या जाणाऱ्या प्राण्याचे आहे. १५० वर्षापूर्वी हा प्राणी ऑस्ट्रेलियात आला तेव्हा त्यांची संख्या होती २४ आणि आजघडीला ती २० कोटी म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक झाली आहे. दरवर्षी या प्राण्याच्या मुळे सरकारला २०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे तब्बल १६०० कोटी रुपयांचा चुना लागतो आहे.

हा प्राणी दुसरा तिसरा कुणी नाही तर ते आहेत ससोबा. अगदी निष्पाप दिसणारे आणि अतिशय भित्रे ससे ऑस्ट्रेलिया सरकारसाठी मात्र गहिरे संकट घेऊन आले आहेत. आकडेवारी नुसार युरोपीय जातीचे हे ससे देशातील कुरणे, आणि शेतीचे तसेच धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. याच्यामुळे देशातील जमिनीची सुपीकता कमी होत आहे. हे ससे आक्रमक आहेत त्यामुळे अन्य वन्यजीवांशी स्पर्धा करतातच पण ३०० प्रकारची झुडपे आणि प्राण्यांसाठी धोका निर्माण करत आहेत. कृषी क्षेत्रासाठी हे ससे घातक ठरले आहेत.

ऑस्ट्रेलियात हे ससे आले कसे त्याची कहाणी मनोरंजक आहे. २५ डिसेंबर १८५९ मध्ये मेलबोर्न पोर्टवर इंग्लंडच्या जहाजातून थॉमसन ऑस्टीन नावाच्या एका माणसाला २४ ससे नाताळ गिफ्ट म्हणून पाठविले गेले. ऑस्टीनला ससे पालन करायचे होते म्हणून त्यानेच ते मागविले होते. यात काही जंगली ससे होते तर काही पाळीव होते. जहाजाच्या ८० दिवसांच्या प्रवासात या सश्याचे मिक्स ब्रीड होऊन नवी पिले जन्माला आली आणि ५० वर्षातच त्यांची संख्या १३ पटीने वाढली. आता ही संख्या २० कोटींवर गेली आहे.