प्रिन्सेस डायनाच्या फोर्ड एस्कॉर्टला ६ कोटींची बोली

जगातील प्रसिद्ध महिलांच्या यादीत मृत्यूनंतरही वरचढ असलेली ब्रिटनच्या राजघराण्याची सून प्रिन्सेस डायना हिच्या १९८० च्या दशकातील फोर्ड एस्कॉर्ट कारला लंडन येथे झालेल्या लिलावात तगडी बोली मिळाली. लंडनच्याच एका व्यक्तीने या कार साठी ६,५०,००० पौंड म्हणजे सहा कोटी रुपयांची बोली लावली. फोर्डची ही ब्लॅक आरएस टर्बो कार डायनाने २३ ऑगस्ट १९८५ ते १ मे १९८८ या काळात स्वतःसाठी वापरली होती. डायना तिच्या वैयक्तिक कामासाठी ही कार स्वतःच चालवीत असे.

सिल्व्हरस्टोन ऑक्शनचे क्लासिक कार तज्ञ अर्वेल रिचर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार आरएस टर्बो ही उत्तम गुणवत्तेची कार डायनाची फार आवडती होती. कधीतरी अचानक प्रवासासाठी जाताना ती ही कार नेत असे. तश्या तिच्या ताफ्यात अनेक अलिशान कार्स होत्या पण ही तिची विशेष आवडती होती.

चेल्सी मार्केट आणि केसिंग्टन रोडवर ही कार ड्राईव्ह करताना अनेकांनी डायनाला बरेच वेळा पहिले होते. वरील काळात डायना या कारची मालकीण होती. डायनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यात अनेक खास सुविधा दिल्या गेल्या होत्या. ५ स्लॉट फ्रंट ग्रील, ग्लोव कम्पार्टमेंट मध्ये रेडीओ सह सुरक्षा अधिकाऱ्यासाठी सेकंडरी रियर व्ह्यू मिरर आजही पाहायला मिळतो.

३१ ऑगस्ट १९९७ मध्ये डायनाचा ३६ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला होता. शाही परंपरा तोडून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली डायना नेहमीच चर्चेत राहिली. लंडनच नवे तर दुनियेत तिचे आजही अनेक चाहते आहेत.