नोकऱ्या बदलण्याचा ट्रेंड आयटी कंपन्यांना ठरली डोकेदुखी

देशातील आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या बदलण्याचा वेग वाढत चालल्याने कंपन्यांना ही मोठी डोकेदुखी झाली आहे. नोकऱ्या सोडणे, एचआर विभागाचा वाढलेला खर्च आणि एकाचवेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी काम करण्याची कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती यामुळे कंपनी व्यवस्थापन जेरीला आले आहे. नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणाला अॅट्रीशन रेट म्हटले जाते. देशातील टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या आघाडीच्या कंपन्यांनी जूनच्या तिमाहीत सुमारे ५० हजाराहून अधिक कर्मचारी भरती केली आहे पण तज्ञांच्या मते आयटी टॅलंट स्पर्धा लक्षात घेतली तर मनुष्यबळ अजून बरेच वाढायला हवे आहे. मागणीनुसार भरती करण्याचे धोरण सध्या कंपन्या स्वीकारत आहेत पण तंत्रज्ञान क्षेत्राबाहेरील कंपन्या सुद्धा डिजिटल जगातील त्यांच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयटी तज्ञ लोकांच्या शोधात आहेत.

टीमलीज डिजिटलचे प्रमुख सुनील यांच्या मते येत्या ५ वर्षात ६० लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत आणि यामुळे आयटी प्रोफेशनल उत्साहात आहेत. पण कंपनी व्यवस्थापन मात्र कर्मचारी पलायन, वाढलेले खर्च यामुळे चिंतेत आहेत. इन्फोसिसने जून तिमाहीत २११७१ नवीन भरती केली आहे मात्र त्यांचा अॅट्रीशन रेट गतवर्षीच्या १३.९ वरून यंदा २८.४ वर गेला आहे. विप्रोने याच काळात १५४४६ नवीन भरती केली आहे आणि त्यांचा अॅट्रीशन रेट गतवर्षीच्या १५.५ वरून २३.३ वर तर टीसीएसचा हाच रेट ८.६ वरून १९.७ वर गेला आहे.