भारत पाक सामना- हे रेकॉर्ड करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू
युएईमध्ये सुरु झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान मधला रोमांचक सामना भारताने खिशात टाकला आहेच पण त्याचबरोबर या सामन्यात मैदानावर येताच टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. असे रेकॉर्ड आतापर्यंत फक्त दोनच खेळाडू नोंदवू शकले आहेत. पैकी पहिला आहे न्यूझीलंडचा रॉस टेलर आणि दुसरा आहे भारताचा विराट कोहली.
या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या तीनही फॉर्मेट मध्ये १०० वर सामने खेळले आहेत. कोणत्याही क्रिकेट खेळाडूसाठी स्वप्नवत असलेले हे रेकॉर्ड विराटने प्रत्यक्षात केले आहे. भारत पाकिस्तान सामना विराट साठी १०० वा टी २० सामना होता आणि कोहली साठी हा त्याच्या करिअर मधला ऐतिहासिक क्षण होता.
यापूर्वी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ११२ टेस्ट (७६८३ धावा), २३६ वनडे (८६०७ धावा) आणि १०२ टी २० मध्ये १९०९ धावा करून हे रेकॉर्ड केले आहे. आता विराटने यात दुसरा नंबर लावला आहे. विराटने त्याच्या करीयर मध्ये अनेक रेकॉर्ड नोंदविली आहेत. त्याने टी २०चा हा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. त्याने १२ जून २०१० मध्ये झिम्बाब्वे विरुध्द टी २० डेब्यू केला होता. त्याने या प्रकारात ३३०८ धावा काढल्या आहेत. विराटने २६२ वनडे मध्ये १२३४४ तर १०२ कसोटी सामन्यात ८०७४ धावा केल्या आहेत.