Asia Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा दिलासा, संघाशी जोडला गेला राहुल द्रविड


आशिया चषक स्पर्धेतील भारताची मोहीम 28 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. सलामीच्या लढतीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाशी आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने कोरोनावर मात केली असून तो आजच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये उपलब्ध असेल. यासह व्हीव्हीएस लक्ष्मण भारतात परतणार आहे.

वास्तविक, आशिया कपसाठी दुबईला जाण्यापूर्वी राहुल द्रविडचा कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तो टीम इंडियासोबत प्रवास करू शकला नाही. बीसीसीआयने राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला अंतरिम प्रशिक्षक म्हणून दुबईला पाठवले. पण आता राहुल द्रविड पूर्णपणे सावरला आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड शनिवारी रात्री उशिरा दुबईला पोहोचला आणि संघात सामील झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुल द्रविड ड्रेसिंग रूमचा भाग असेल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर लक्ष्मण भारतात परतल्याची माहितीही क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

खूप महत्वाचा आहे सामना
बीसीसीआयने आपल्या निवेदनात आधीच सांगितले होते की, राहुल द्रविड कोरोनाला हरवून संघात सामील होईल. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले होते की, टीम इंडियाने लक्ष्मण यांच्या प्रशिक्षकपदाखाली झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण दुबईत टीम इंडियासोबत असेल. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने राहुल द्रविड संघासह दुबईला जाणार नाही. पण राहुल द्रविडचा कोविड 19 रिपोर्ट निगेटिव्ह येताच तो संघात सामील होईल.