दुखापतीतून सावरलेल्या नीरजची सुवर्णपदकाला गवसणी, लिहिला नवा इतिहास

भारताचा भालाफेकपटू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने दुखापतीतून सावरून पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन केले आहे आणि नव्याने इतिहास रचला आहे. लुसाने डायमंड लीग मध्ये त्याने पुन्हा सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हा खिताब मिळविणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने ७ आणि ८ सप्टेंबरला जुरीख येथे होणार्या डायमंड लीगच्या अंतरिम फेरीत थेट प्रवेश मिळविला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

२४ वर्षीय नीरजने याच बरोबर २०२३ मध्ये हंगेरीच्या बुडापेस्ट येथे होत असलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. नीरजने लुसाने येथे पहिल्याच प्रयत्नांत ८९.०४ मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळविले. गतवेळी वर्ल्ड चँपियनशीप मध्ये त्याने रजत पदकाची कमाई केली होती आणि तेव्हाच त्याच्या मांडीचा स्नायू जबर दुखावला गेला होता. परिणामी नीरजला बर्मिघम मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत माघार घ्यावी लागली होती. दुखापतीतून पूर्ण सावरल्यावर नीरजची लुसाने डायमंड लीग ही पहिलीच स्पर्धा होती.