‘वर्क फ्रॉम होम’ महिला भागीदारी वाढण्यास उपयुक्त- पं. मोदी

‘जग डिजिटल युगात प्रवेश करत आहे, कामाच्या ठिकाणातील लवचिकता आणि वर्क फ्रॉम होम ही भविष्यातली गरज बनणार आहे. यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालय व्हिजन २०४७ तयार करत आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या श्रम मंत्रालयाच्या संमेलनात बोलताना सांगितले. व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान बोलत होते. विशेषतः वर्क फ्रॉम होम मधून महिला श्रमशक्तीची भागीदारी वाढविण्यास चांगली संधी आहे असेही ते म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले आपण जर स्वतःला या परिस्थितीसाठी तयार ठेवले नाही तर आपण मागे पडू शकतो. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ आपल्याला हवा त्या प्रमाणात मिळाला नाही आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी कामाचे स्वरूप बदलले आहे. ऑनलाईन शॉपिंग, आरोग्य सेवा, वाहतूक सेवा, फूड डिलिव्हरी आज शहरी जीवनाचे अभेद्य अंग बनले आहे. लाखो युवक या सेवातून नव्या बाजाराला गती देत आहेत. योग्य धोरणे आणि योग्य प्रयत्न यांची साथ मिळाली तर आपण जागतिक लीडर बनू शकतो.

केंद्र सरकारने ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक कामगाराला सुरक्षा दिली आहे. गेल्या एक वर्षात या पोर्टलकडे ४०० विविध क्षेत्रात काम करणारे २८ कोटी श्रमिक जोडले गेले असून त्याचा सर्वाधिक फायदा बांधकाम सारख्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.