ऑस्ट्रेलियात घोंगावू लागलेय आर्थिक मंदीचे वादळ

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियात आर्थिक मंदीचे वादळ घोंगावू लागले असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रॉपर्टी बाजारात याचा स्पष्ट प्रभाव जाणवू लागला असून गेल्या तीन महिन्यात घरांच्या किंमती ५ टक्के कमी झाल्या आहेत. कमाईच्या तुलनेत कर्जदर १८७.२ टक्के वाढल्याने जोखीम वाढली आहे. १९९१ च्या मंदीनंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया अश्या परिस्थितीला सामोरे जात आहे. कर्जव्याज दरातील वाढ, महागाई आणि त्या तुलनेत कमी झालेली कमाई ही त्यामागची कारणे सांगितली जात आहेत. याचा सर्वाधिक प्रभाव सिडने शहरावर पडला आहे.

राष्ट्रीय पातळीवर घर किंमती २ टक्के कमी झाल्या आहेत आणि आगामी काळात हाच ट्रेंड कायम राहील असे अर्थतज्ञ सांगत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिझर्व बँकेने गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा व्याजदर वाढविले आहेत. एस अँड पी ग्लोबल रेटिंग चे मुख्य अर्थतज्ञ लुई कुदुज म्हणाले , ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात खुला बाजार आहे, जीडीपीच्या तुलनेत कर्ज जास्त झाल्याने अर्थव्यवस्था दुबळी बनत चालली आहे. ऑस्ट्रेलियात जीडीपीच्या तुलनेत कर्ज १२६ टक्के जास्त आहे. कॅनडामध्ये हे प्रमाण १०८ टक्के, ब्रिटन मध्ये ९० तर अमेरिकेत ८० टक्के  आहे.