सोने साठे वाढविण्यास भारताचे प्राधान्य

आर्थिक मंदी आणि अन्य समस्यांमुळे जगात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असताना भारताने देशाचा सोने साठा (गोल्ड रिझर्व) वाढविण्यास सुरवात केली आहे. २०२१ जुलै ते २०२२ जून या काळात ६३ टन सोने खरेदी रिझर्व बँकेकडून केली गेल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. या खरेदीमुळे भारत राखीव सोने साठे असलेल्या जगातील टॉप १० देशात सामील झाला आहे. सोने ही कोणत्याही देशाची मजबुती दाखविणारे प्रतिक आहे. देशाकडे राखीव साठ्यात जितके जास्त सोने तितके देशाचे चलन मजबूत आणि अर्थव्यवस्था चांगली मानली जाते.

काही वर्षांपूर्वी भारत सोने गहाण ठेऊन अन्य देशातून पैसा उभा करत होता. मात्र २०१४ पासून अमेरिकी डॉलर्सला थोडे बाजूला ठेऊन भारताने सोने साठा वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत ७०५.६ टन सोने भारताच्या तिजोरीत होते ते २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत ९ टक्के वाढून ७६८ टन झाले आहे. गेल्या २० वर्षात हा साठा दुपटीपेक्षा अधिक झाला आहे.

अर्थात सोने जमा करणारा भारत हा एकमेव देश नाही. २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत ग्लोबल सेन्ट्रल बँकांनी १८० टन सोने खरेदी केले आहे. पहिल्या सहामाहीत तुर्कस्तानने ६३ टन, इजिप्त ४४ टन, इराकने ३४ टन सोने खरेदी केले आहे. अमेरिकन रिझर्व जगात सर्वाधिक असून त्यांच्याकडे ८१३३ टन सोने आहे. दोन नंबरवर जर्मनी आहे आणि त्यांच्या राखीव साठ्यात ३३५५ टन सोन आहे. या यादीत ३ नंबरवर आंतरराष्ट्रीय नाणे निधी आहे. सर्व देशांच्या केंद्रीय बँका हा सोने साठा करतात आणि वित्तीय सुरक्षेसाठी त्याचा कधीही वापर करू शकतात.