Monkeypox : एकाचवेळी मंकीपॉक्स, कोरोना आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळली व्यक्ती, जगातील अशी पहिलीच घटना


रोम – जगातील पहिलेच असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने इटालियन संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, इटलीतील एक नागरिक एकाच वेळी मंकीपॉक्स, कोरोना आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तो नुकताच पाच दिवसांच्या स्पेन दौऱ्यावरून परतला होता.

जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 36 वर्षीय व्यक्तीला स्पेनहून परतल्यानंतर सुमारे 9 दिवसांनी ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि कंबरेत सूज येण्याची तक्रार आढळून आली. लक्षणे दिसल्यानंतर तीन दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

काही तासांतच त्याच्या डाव्या हातावर पुरळ उठली आणि नंतर त्याच्या अंगावर फोड आले. सिसिलीच्या पूर्व किनाऱ्यावरील कॅटानिया या शहराच्या रुग्णालयात त्याला तातडीने दाखल करण्यात आले. तपासात डॉक्टरांनी तिन्ही आजारांची पुष्टी केली आहे.