IND vs PAK Asia Cup : 36 वर्षांपूर्वी भारतीय संघाच्या भीतीने रडत होते पाकिस्तानी खेळाडू, वसीम अक्रमचा खुलासा


नवी दिल्ली – आशिया कपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ 15 व्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये आतापर्यंत भारताचे पारडे पाकिस्तानवर जड गेले आहे. दोन्ही संघांमधील स्पर्धा अतिशय रोमांचक आहे. या दोन देशांच्या चाहत्यांच्याच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळाडूंवर खूप दडपण असते. या दडपणाखाली काही खेळाडू चमकतात, तर काही फ्लॉप होतात. सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू रडायला लागल्याचेही एक प्रकरण आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने याबाबत खुलासा केला आहे. 1986 मध्ये अॅस्ट्रल-आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत होता. हा सामना अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला आणि या सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू रडू लागले होते.

काय घडले होते 36 वर्षांपूर्वी ?
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या. सुनील गावस्करने 92, कृष्णमाचारी श्रीकांतने 75 आणि दिलीप वेंगसरकरने 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. नऊ धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली आणि 181 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. 241 धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानची नववी विकेट पडली, पण जावेद मियांदाद शतकी खेळी करत होता. पाकिस्तानला विजयासाठी अजूनही पाच धावांची गरज होती.

पाकिस्तानवर पराभवाचे सावट पसरले आणि संघातील खेळाडू रडू लागले. एका स्पोर्ट्स चॅनलशी संवाद साधताना वसीम अक्रम म्हणाला, मला आठवते की मी रन आऊट झालो होतो. तौसीफ अहमदने सिंगल घेतली, मग मियांदादने ते (षटकार) केले. तेव्हा मी तरुण खेळाडू होतो. झाकीर खान आणि मोहसिन कमाल हेही तरुण खेळाडू होते. ते दोघेही नॉन स्टॉप रडत होते. मी विचारले भाऊ तू का रडतोस. दोघे म्हणाले की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. मी म्हणालो की जर रडून सामना जिंकता आला असता, तर मी तुम्हा दोघांसोबत रडायला लागलो असतो. आता एवढा विचार करा की बॉल जावेद भाईच्या बॅटवर चांगला येतो.

या सामन्यात जावेद मियांदादने चेतन शर्माच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तो सामन्याचा शेवटचा चेंडू होता. ऑस्ट्रेलिया-आशिया चषक स्पर्धेत एकूण पाच संघ सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.