मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, कमवायचे होते झटपट पैसे


मुंबई : मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी देणाऱ्या गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील दोघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली. यासंदर्भातील माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईतील अंधेरी भागात असलेले हॉटेल उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कॉलरला पकडण्यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. वलसाड पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) मुंबई पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात मदत केली.

झटपट पैसे कमवण्यासाठी केले हे काम
वलसाड एसओजीचे उपनिरीक्षक एल जी राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना बुधवारी पहाटे तीन वाजता वलसाडच्या वापी शहरातून अटक करण्यात आली. विक्रम सिंग आणि येशु सिंग अशी दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी मूळचे बिहारचे असून सध्या वापी येथे राहतात. एलजी राठोड म्हणाले, दोन्ही आरोपी बिहारचे आहेत आणि वापीमध्ये नोकरी करतात. झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने हॉटेल उडवून देण्याची धमकी देण्याचा विचार केला. त्यानंतर येशूने त्याचे सिमकार्ड वापरून ऑनलाइन शोध घेतला आणि मुंबईतील ललित हॉटेलच्या लँडलाइन नंबरवर कॉल केला.

गुजरात पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने आधी रिसेप्शनिस्टशी बोलून हॉटेल उडवून देण्याची धमकी दिली. नंतर त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाशी बोलून हॉटेल वाचवण्यासाठी व्यवस्थापनाकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली. एलजी राठोड म्हणाले, दोघांनी हॉटेल मॅनेजरला पैसे घेऊन सुरतला येण्यास सांगितले होते. हॉटेलमधून तक्रार मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक वापी येथे आले आणि त्यांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ते म्हणाले की, सहार येथे एफआयआर दाखल झाल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मुंबईला आणले.