अभिनेत्री मोना आंबेगावकरचे सावरकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट, शिवसेना खासदाराने केली कारवाईची मागणी


मुंबई : अभिनेत्री मोना आंबेगावकर हिने वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

शेवाळे यांनी गृह राज्यमंत्री मिश्रा यांना संबंधित यंत्रणांना वादग्रस्त ट्विट काढून टाकण्याचे निर्देश देण्यास सांगितले. शेवाळे यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मोना आंबेगावकर यांनी 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.47 वाजता केलेल्या ट्विटकडे मी तुमचे लक्ष वेधत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेले हे ट्विट खूप वादग्रस्त आहे. त्यात सत्यता नाही. मला वाटते यात ऐतिहासिक तथ्य नाही आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध लढणाऱ्या एका महान स्वातंत्र्यसैनिकाबद्दल त्यांच्या मनात चीड आहे.

या ट्विटचा तीव्र शब्दात निषेध करत शेवाळे यांनी गृहराज्यमंत्री मिश्रा यांना या ट्विटची कठोर दखल घेऊन संबंधित एजन्सीला हे ट्विट सोशल मीडियावरून तत्काळ हटवण्याचे आदेश देण्यास सांगितले. तसेच प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध असे बनावट ट्विट केल्याबद्दल अभिनेत्रीवर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. मात्र, आता हे वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

मोना आंबेगावकरने हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोनाने मंगल पांडे, मर्दानी आणि टीव्ही सीरियल सीआयडीमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर भाजप आणि संघाच्या नेत्यांविरोधात वक्तव्ये करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.