रेडमी नोट ११ एसई, लाँच होतोय बजेट स्मार्ट फोन

शाओमीने त्यांचा रेडमी नोट ११ एसई, २६ ऑगस्ट रोजी भारतात लाँच केला जात असल्याची घोषणा केली असून ३१ ऑगस्ट पासून फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. फोनची किंमत अजून जाहीर झालेली नसली तरी हा बजेट स्मार्टफोन आहे आणि साधारण ११ ते १२ हजार दरम्यान त्याची किंमत असेल असे संकेत दिले गेले आहेत. रेडमी लाईन अप मधील हा कंपनीचा सहावा फोन आहे. कंपनीने सोशल मिडीयावर फोन लाँच होत असल्याच्या बातमीची पुष्टी केली आहे आणि काही फीचर्स उघड केली आहेत.

या फोन साठी क्वाड कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा, ८ एमपीचे अल्ट्रावाईड, २ एमपीचे डेप्थ, २ एमपीचे मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी साठी १३ एमपीचा कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट रीडर दिले गेले असून फोन साठी ६.४३ इंची एफएचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले, गोरील्ला ग्लास प्रोटेक्शन सह आहे. होल पंचकट आउट आहे. ५ हजार एमएएचची बॅटरी ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे.

अँड्राईड १२ ओएस असून चार रंगांमध्ये हा फोन उपलब्ध केला गेला आहे. यापूर्वी कंपनीने ११ टी फाईव्ह जी, नोट ११, नोट ११ प्रो प्लस फाईव्ह जी, ११ एस, ११ प्रो हे फोन सादर केले आहेत.