युरोप दुष्काळ, नद्या, सरोवरातून बाहेर येताहेत अनेक रहस्यमय गोष्टी

युरोप यंदा अतिशय भीषण दुष्काळाचा सामना करतो आहे. अनेक देशातील नद्या आणि सरोवरे कोरडी पडली आहेत आणि त्यामुळे दीर्घकाळ पाण्यात बुडालेल्या अनेक रहस्यमय गोष्टी, खजिने, जिवंत बॉम्ब आता उघड्यावर आले आहेत. यात दुसऱ्या जागतिक महायुद्धात वापरले गेलेले, पण न फुटलेले अनेक बॉम्ब सुद्धा आहेत.

युरोपीय देशातील अनेक नद्यांचा जलस्तर वेगाने कमी होतो आहे आणि अनेक ठिकाणी नद्या सरोवरांचे तळ दिसू लागले आहेत. स्पेन मध्ये गेल्या अनेक वर्षातील भीषण दुष्काळ यंदा अनुभवास येतो आहे. नदी पात्रे, सरोवरे आटल्याने पुरातत्व विभागाचे संशोधक वर्षानुवर्षे पाण्यात बुडालेल्या रहस्यमयी खडकांचा अभ्यास करू लागले आहेत. यातून निसर्गाची अनेक गुपिते समोर येतील अशी त्यांना आशा आहे. या खडकांना स्पॅनिश हेंज म्हटले जाते. बहुतेक वेळा असे खडक नद्यांचे बांध, किनार्यांवर सापडतात. स्पेनच्या वालेकनस जलाशयात १९२६ मध्ये प्रथम जर्मन पुरातत्व तज्ञ ह्युगो याने हे खडक शोधले होते. त्यानंतर फक्त चार वेळा हे खडक पाण्याबाहेर आले आहेत.

जर्मनीच्या राईन नदी मधून सुद्धा पाणी पातळी कमी झाल्याने काही खडक बाहेर आले आहेत. या खडकांची जर्मन लोकांना भयंकर धास्ती आहे. या दगडांना ‘भूक दगड’ असेच नाव आहे. कारण जेव्हा जेव्हा हे खडक दिसतात तेव्हा तेव्हा जर्मनीला दरवेळी मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे.  यापूर्वी १९४७,१९५९,२००३ आणि २०१८ मध्ये हे खडक दिसले होते.