आशिया कप, भारत-पाक सामन्यात होणार नवे विश्वरेकॉर्ड

आशिया कप स्पर्धा सुरु होण्यास आता अगदी थोडा अवधी राहिला आहे. या स्पर्धेत सुमारे १० महिन्यांच्या गॅप नंतर पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याची दोन्ही टीमच्या चाहत्यांना अनिवार उत्सुकता आहे. या वेळच्या भारत पाक सामन्यात एक वेगळेच विश्व रेकॉर्ड नोंदविले जात आहे. ते म्हणजे २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण एकाचवेळी १३२ देशात होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात एकाच वेळी एका सामन्याचे प्रक्षेपण इतक्या देशात आजवर कधीच झालेले नाही.

आशिया कप २७ ऑगस्टपासून सुरु होत असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्थान यांच्यात होणार आहे. यावेळचे आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे. मात्र श्रीलंकेतील परिस्थिती सध्या फारच बिकट आणि अस्थिर असल्याने ही स्पर्धा युएई मध्ये आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेत ६ टीम सहभागी होणार आहेत.

भारताचे लाइव प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. या शिवाय डीडी फ्री डिश आणि डीडी स्पोर्ट्सवर सुद्धा या सामन्यांचा आनंद रसिक घेऊ शकणार आहेत. भारताच्या टीम मध्ये रोहित शर्मा कप्तान, केएल राहुल उपकप्तान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, यजुवेन्द्र चहल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि आवेरा खान यांचा समावेश आहे.