नीतू सिंग यांच्या घरात गणपती बाप्पा होणार विराजमान

बॉलीवूड मधील नेहमी चर्चेत असलेले कपल रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांच्याबद्दल आणखी एक खास बातमी आली आहे. रणबीर आलीया यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे हे सर्वाना माहिती आहेच. मग हा छोटा पाहुणा सुधृढ, आरोग्यसंपन्न व्हावा म्हणून आजी नीतू सिंग तिच्या घरी एक खास पूजा आयोजित करत आहे. विशेष म्हणजे गणेशचतुर्थी दिवशी ही पूजा होणार असून त्या अगोदर नीतू सिंग यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.

कपूर खानदानात गणेश उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. गेली अनेक वर्षे चेंबूरच्या आरके स्टुडीओ मध्ये भली मोठी गणेश मूर्ती बसविली जात असे आणि कपूर खानदानातील सर्व लहान थोर मिरवणुकीत ढोल नगाऱ्यांसह सामील होत असत. स्टुडीओ एकाद्या नव वधू सारखा सजविला जात असे. बॉलीवूड मधील अनेक सेलेब्रिटी सुद्धा या उत्सवात सामील होत असत. पण आता हा स्टुडीओ २०१९ मध्ये विकला गेला असून तेव्हापासून येथे गणेश स्थापना झालेली नाही. मात्र परंपरा खंडित होऊ नये म्हणून नीतू यंदाही घरातच गणेश स्थापना करणार आहे. अर्थात नीतू सिंग यांनी यावेळी दिवंगत पती ऋषी यांची आठवण काढली आहे. ऋषी मोठ्या उत्साहाने या समारंभात सामील होत असत असे तिने सांगितले आहे.