रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले, म्हणाले काय खात्री आहे आयुर्वेदाने सर्व आजार बरे होतील याची?


नवी दिल्ली – इंडियन मेडिकल असोसिएशनने अॅलोपॅथी उपचार आणि लसीकरणाविरोधात बाबा रामदेव यांच्या वक्तव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश (CJI) NV रमणा म्हणाले की, बाबा रामदेव यांनी इतर वैद्यकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे टाळावे.

सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांना अॅलोपॅथी डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेक प्रश्न विचारले आहेत. अॅलोपॅथी आणि त्याची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी न्यायालयाने बाबा रामदेव यांच्यावर ताशेरे ओढले. बाबा रामदेव यांना अशी विधाने करण्यापासून रोखण्याची मागणी केंद्राला करण्यात आली आहे. कोर्ट म्हणाले, बाबा रामदेव अॅलोपॅथी डॉक्टरांवर आरोप का करत आहेत? त्यांनी योग लोकप्रिय केला, हे चांगले आहे, परंतु त्यांनी इतर प्रणालींवर टीका करू नये.