KBC Prize Money: स्पर्धकांना का मिळत नाही बक्षीसाची पूर्ण रक्कम, काटछाट करुन उरतात एवढेच पैसे


सन 2000 पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रत्येक वयोगटातील लोकांचे मनोरंजन करतो. हा शो सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. हा शो सुरू झाल्यापासून तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. सामान्य माणसाला करोडपती बनवणारा हा शो आहे. या शोमध्ये येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते आणि अनेकांचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. अनेक लोक लखपती, तर काही करोडपती झाले.

स्पर्धकासाठी, त्याने 50 लाख किंवा 1 कोटी 7 कोटी जिंकणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की स्पर्धकांना त्यांची बक्षिसाची रक्कम कधीच पूर्ण मिळत नाही. होय, तुम्ही ते बरोबर वाचले! कोणत्याही स्पर्धकाला त्याची बक्षीस रक्कम पूर्ण मिळत नाही. याचे कारण म्हणजे कर. सर्व बक्षिसांच्या रकमेवर कराची मोठी रक्कम कापली जाते, त्यानंतरच पैसे स्पर्धकाच्या बँक खात्यात येतात.

स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम का मिळत नाही?
समजा, जर एखाद्या स्पर्धकाने 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली, तर त्याला एक किंवा दोन लाख नाही तर संपूर्ण 13.30 लाख रुपये टॅक्स म्हणून भरावे लागतात. म्हणजेच कोणत्याही स्पर्धकाला दाखविल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम कमी मिळते हे तुम्हाला समजते. समजा, एका स्पर्धकाने 50 लाख रुपये जिंकले आहेत. त्याला बक्षिसाच्या रकमेच्या 30 टक्के म्हणजे 12 लाख रुपये कर म्हणून भरावे लागतात. याशिवाय बक्षीस रकमेतून 10 टक्के (रु. 13,125) अधिभार आणि 4 टक्के (रु. 5,250) उपकरही कापला जातो. एकूणच, स्पर्धकाच्या हातात 50 लाखांच्या बक्षीस रकमेऐवजी केवळ 35 लाख रुपयेच खात्यात जमा होतात.

kbc 14 चे नवीन नियम
नुकताच कौन बनेगा करोडपतीचा 14वा सीझन सुरु झाला आहे. यावेळी खेळात बदल करण्यात आला आहे. आता बक्षिसाची रक्कम 7 कोटींऐवजी 7.5 कोटी रुपये आहे. तसेच 50 लाखांनंतर 75 लाख रुपयांचा म्हणजेच धन अमृतचा स्लॉटही ठेवण्यात आला आहे. आता स्पर्धकांना 50 लाखांनंतर 75 लाख रुपये जिंकण्याचीही संधी आहे. या हंगामात आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपतींच्या यादीत सामील झालेला नाही.