भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत 45 स्थानांनी झेप घेत 38व्या स्थानावर पोहोचला आहे.
ICC ODI Batsmen Rankings : शुभमन गिलची बंपर लॉटरी, तर धवनला तोटा, जाणून घ्या नवीनतम अपडेट
22 वर्षीय सलामीवीराने नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. हरारे येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या 97 चेंडूत 130 धावा केल्या होत्या. याआधी त्याने दुसऱ्या वनडेत 33 आणि पहिल्या वनडेत नाबाद 82 धावा केल्या होत्या.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याला विश्रांती देण्यात आली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्माही सहाव्या स्थानावर कायम आहे. झिम्बाब्वे दौऱ्यातूनही त्याला विश्रांती देण्यात आली होती.
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांत 154 धावा केल्या असूनही अनुभवी सलामीवीर शिखर धवनची 12व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या वनडेत त्याने अर्धशतके झळकावली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एकूण 891 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रसी व्हॅन डर डुसेन आहे ज्याचे 789 रेटिंग गुण आहेत.
एकदिवसीय क्रमवारीतील शीर्ष 10 फलंदाज
1- बाबर आझम, 2- रासी व्हॅन डर डुसेन, 3- क्विंटन डी कॉक, 4- इमाम-उल-हक, 5- विराट कोहली, 6- रोहित शर्मा, 7- डेव्हिड वॉर्नर, 8- जॉनी बेअरस्टो, 9- रॉस टेलर , 10- आरोन फिंच.
दुसरीकडे, गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत जोश हेझलवूड दुसऱ्या, मुजीब उर रहमान तिसऱ्या, जसप्रीत बुमराह चौथ्या आणि शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे.