Chhatrapati Tararani : हा चित्रपट समोर आणणार औरंगजेबच्या अत्याचाराचे सत्य, सोनाली साकारणार महत्त्वाची भूमिका


मुघल शासक औरंगजेबाच्या काळात भारतात झालेल्या अतिरेकांवर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपटानंतर आता त्याच काळातील आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चित्रपटांमधील साम्य म्हणजे औरंगजेबाचा महाराष्ट्रात दक्षिणेकडे होणारा मोर्चा थांबवणाऱ्या मराठा वीरांची कथा नव्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुघलांच्या काळात महाराष्ट्रातील शूर योद्ध्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते आणि येथील विरोधामुळे मुघलांचा प्रभाव दक्षिण भारतापर्यंत पोहोचू शकला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नटरंग’, ‘टाईमपास 2’, ‘गोष्ट लग्नानंतरची’ यांसारख्या चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या पडद्यावर एक अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे, ज्याची महाराष्ट्राच्या इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई सारख्या व्यक्तिमत्वासोबत गणना केली जाते. सोनाली पडद्यावर दिग्गज मराठा योद्धा राणी छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणार आहे. या मराठी चित्रपटाचे नाव ‘मुघल मर्दिनी छत्रपती ताराराणी’ असे ठेवण्यात आले आहे.

इतिहासकारांच्या मते, छत्रपती ताराराणी हे एक असे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी औरंगजेबाला कडवी टक्कर दिली. ताराराणी वयाच्या 25 व्या वर्षी विधवा झाल्या, तरीही त्यांनी आपले धैर्य सोडले नाही. आपल्या लोकांच्या स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक विदेशी शासक, मुघल, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज शासकांशी सतत लढा दिला.

‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेली सोनाली कुलकर्णी म्हणते, या चित्रपटात मी छत्रपती ताराराणी या शूर महिलेची भूमिका साकारणार आहे, जिने मराठा संस्कृतीचा अभिमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मलाही प्रेरणा देणारी ही कथा आहे आणि हा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करायला मी उत्सुक आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणे ही मोठी जबाबदारी असते. ही भूमिका साकारण्यासाठी मी शारीरिक आणि मानसिक तयारी करत आहे.

‘मुघल मर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय मराठी दिग्दर्शक राहुल जाधव करत आहेत. ते म्हणाले, या चित्रपटाबद्दल काहीही सांगणे घाईचे असले, तरी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला एका उंचीवर नेईल हे एवढे मात्र निश्चित आहे. हे सुंदर सादरीकरण आमच्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेण्याची क्षमता या चित्रपटात आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.