स्पेन, एस ८० पाणबुडी भारताला देण्यास उत्सुक

हिंद महासागरात चीनच्या हालचालींमुळे सतर्क झालेल्या भारत सरकारने भारतीय नौदलाची ताकद वाढविण्यास सुरवात केली आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगाल खाडीमध्ये नौदलाची उपस्थिती वाढविली गेली असतानाच स्पेनने भारताला त्यांच्या खास एस ८० प्लस पाणबुडीची ऑफर दिली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेझ या संदर्भात दिल्लीला येत आहेत. भारताच्या प्रोजेक्ट ७५ आय अंतर्गत बनविल्या जात असलेल्या पाणबुडीसाठी एस ८० प्लसची ऑफर देत असल्याचे समजते. या पाणबुडीचे तंत्रज्ञान देण्याची तयारी स्पेनने दाखविली असून हा करार झाला तर भारतातच या पाणबुड्यांची निर्मिती होऊ शकेल असे समजते.

हिंद महासागरातील चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची दुसरी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांतचे कमिशनिंग ५ सप्टेंबर रोजी केले जात आहे. स्पेन भारताबरोबर संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक आहे. स्पेन भारताचा आठवा वाणिज्य भागीदार आहे.

या पाणबुड्यांचे उत्पादन स्पेनमध्ये १९९० च्या दशकाच्या अखेरीपासून होत आहे. २०१० मध्ये तिच्या डिझाईन मध्ये बदल केले गेले. स्पेनच्या नौसेनेकडून या पाणबुड्या वापरल्या जात आहेत. तिची खासियत म्हणजे ही पाणबुडी सहज लोकेट करता येत नाही. पाण्यावर ताशी २२ किमी तर पाण्याखाली ताशी ३५ किमी वेगाने जाऊ शकते. एकावेळी ८ हजार किमी रेंज मध्ये गस्त घालू शकते. ३० ते ३५ दिवस सलग पाण्याखाली राहू शकते. मिसाईल फायर करू शकते आणि समुद्रातून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेऊ शकते. त्यात एआयपी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे त्यामुळे पाण्यात ही पाणबुडी अदृश्य होते. खतरनाक मिशनसाठी तिचे खास डिझाईन केले गेले आहे. एका पाणबुडीची किंमत ९७६.५ दशलक्ष डॉलर्स आहे.