एशिया कपची चमकती ट्रॉफी सादर, विराटची नवी बॅट तळपणार?

श्रीलंकेच्या यजमानपदाखाली २७ ऑगस्ट पासून युएई मध्ये सुरु होत असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबई मैदान सजले आहे आणि स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. आशिया कप स्पर्धेचा हा १२ वा सिझन युएई मध्ये खेळला जात असून त्यात सहा संघ आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्थान आणि सहावी टीम क्वालिफिकेशनच्या माध्यमातून येणार आहे. सर्वच संघ या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहेत. दरम्यान शारजा क्रिकेट स्टेडीयमने ट्वीटरवर आशिया कप ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. सोनेरी रंगाच्या या चमकदार ट्रॉफीला मुकुटासारखा आकार दिला गेला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली आहे. गेल्या दोन दौऱ्यात विश्रांती दिलेला भारताचा माजी कर्णधार आणि ‘रन मशीन’ म्हटला जाणारा विराट कोहली या स्पर्धेसाठी त्याच्या खास नव्या  बॅटसह सज्ज झाला आहे. ही स्पर्धा टी २० फॉर्मेट मध्ये होत आहे. विराटने यावेळी खेळण्यासाठी गोल्डन विझार्ड क्वालिटी बॅट निवडली आहे. इंग्लिश विलो लाकडापासून बनलेल्या या बॅटसची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. या बॅटच्या किंमती २२ हजार रुपयांपासून सुरु होतात असे समजते.

गेले काही दिवस फॉर्म हरविलेल्या विराटची कामगिरी या स्पर्धेत कशी होते यावर सर्व क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागून राहिले आहे. विराटची नवी बॅट या स्पर्धेत तळपणार का याची उत्सुकता वाढली आहे.